पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरच्या छत्रपती शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डनमध्ये कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांची हक्काची जागा उपबल्ध होणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या पर्यटन विकासात भर टाकणाऱ्या या लिनिअर गार्डनमध्ये कलाकार कट्टा साकारणार असल्याची माहिती नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी दिलीयं.
शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड हे प्रामुख्याने उद्योगनगरी अशी ओळख असणारे शहर आहे. परंतू हेच शहर आता त्याची नवीन ओळख आणि वेगळा दृष्टीकोन घेऊन पुढे सरसावतात आहे. पिंपळे सौदागरमध्ये नव्याने पूर्ण होत असलेले छत्रपती शिवाजी महाराज लिनिअर अर्बन गार्डन पिंपरी चिंचवडच्या पर्यटन विकासात एक पाऊल पुढे नेणार आहे.
या गार्डनमध्ये १४०० हून अधिक वड आणि पिंपळाची झाडे आहेत. तसेच जवळपास अडीच किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी सुंदर गजीबो बैठक, ओपन जिम असे सर्वांसाठी सर्वकाही असणारं हे लिनियर गार्डन आता संस्कृती आणि कला क्षेत्रात सुद्धा मोलाचे स्थान निर्माण करणार आहे.
त्यासाठी आम्ही येथे कलाकार कट्टा साकारणार आहोत. कलाकारांची आणि त्यांच्या चाहत्यांच्या हक्काची जागा येथे असणार आहे. कलाकार कट्टा एक मुक्त व्यासपीठ असेल. अनेक कलाकारांसाठी त्यांची कला सादर करण्यासाठी तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडच्या रसिक प्रेक्षकांना आनंद घेण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
जागेची कनेक्टिविटी ही या कट्ट्याची खासियत आहे. या गार्डनमध्ये हा कट्टा असल्याने सर्वच प्रेक्षकांसाठी लक्षवेधी ठरणार आहे. विविध कलेशी संबंधित आकर्षक आणि लक्षवेधी स्टॅच्यू येथे असणार आहेत. उत्तम अशा वातावरणात कला संदर्भात चर्चा असो, प्रॅक्टिस असो, किंवा सादरीकरण असो सर्वच नवोदित कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ येथे उपलब्ध होणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पीसी लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.