पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांनी चाकण आणि निगडी येथे कारवाई करत सहा लाखांपेक्षा अधिक रकमेचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. तसेच लाखो रुपयांची वाहने देखील जप्त केली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि.२६) करण्यात आली.
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण-शिक्रापूर रोडवर रासे येथे चाकण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दिनेश अंबादास सोळंके (वय २७, रा. कडाचीवाडी, ता. खेड), लईस अहमद चौधरी (वय २४, रा. म्हाळुंगे, ता. खेड. मूळ रा. आसाम) या दोघांना अटक केली आहे. आरोपींनी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा दुचाकी आणि टेम्पो मधून विक्रीसाठी नेला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून तीन लाख १५ हजार ३६८ रुपयांचा गुटखा, एक दुचाकी आणि एक टेम्पो असा एकूण सहा लाख ६५ हजार ३६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनाथनगर येथे सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. उत्तम नामदेव वाघमारे (वय २०, रा. निगडी), गणेश चंद्रकांत पवळे (वय ४५, रा. निगडी), विलास ज्ञानदेव ससाणे (वय ३५, रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून उत्तम वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी उत्तम याने आरोपी गणेश याच्या जागेत आरोपी विलास याच्या सांगण्यावरून प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केली. पोलिसांनी कारवाई करून खोलीतून २ लाख ८९ हजारांचा गुटखा, दुचाकीतून २६ हजार १४० रुपयांचा गुटखा, ७० हजारांची दुचाकी, साडेआठ हजार रोख रक्कम असा एकूण तीन लाख ९३ हजार ६८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.