पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या सर्व पदांसह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे.

मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसंच, ‘आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि ‘श्री.राज ठाकरे’ हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील दोन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मनसेच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही.





















Join Our Whatsapp Group