पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आलेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर शहरातील खेळाची मैदाने देखील बंद करण्यात आलीत. कोरोनाच्या या लढाईत तंदरूस्त राहण्यासाठी व्यायाम हा एक चांगला उपाय आहे. त्यामुळे मैदाने बंद करणे हा निर्णय चुकीचा असल्याची भावना खेळाडू व्यक्त करीत आहेत. तरी लवकरात लवकर शहरातील खेळाची मैदाने पुन्हा खुली करण्यात यावीत अशी मागणी शिवसेना युवानेते, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केली आहे.
जितेंद्र ननावरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढु लागल्याने प्रशासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे नवे निर्बंध लागू झाल्याने मैदाने संपुर्ण बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे.
कोरोना काळामध्ये शरीर तंदुरुस्त आणि संतुलित राखण्यासाठी व्यायामाची गरज असताना प्रशासनाने मैदाने बंद ठेवण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याची प्रतिक्रिया खेळाडूंमध्ये उमटत आहे. त्या उलट चित्रपटगुहे, हॉटेल, बार या सारख्या गोष्टी बंदिस्त हवा असताना ती सुरु आणि मैदाने खुली असताना ती बंद केल्याने पिंपरी चिंचवडकर संताप व्यक्त करत आहेत.
मैदाने बंद असल्याने पोलिस भरतीचा सराव करता येणार नाही. त्यामुळे पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांचे भवितव्य टांगणीस लागले आहे. सरावात होणाऱ्या खंडामुळे मैदानी स्पर्धाची तयारी करणाऱ्या खेळाडूच्या कामगिरीवर लक्षणीय परिणाम होऊ लागला आहे. शिवाय खेळाडूंचे वय निघून चाललेले आहे. त्याशिवाय शाळा कॉलेज गेल्या दोन वर्षापासून बंद असलेने मुलांमध्ये मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन लागले आहे.
यातून बाहेर पडण्यासाठी मैदानी खेळ खेळणे मुलांना गरजेचे असल्याने प्रशासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करून शहरातील मैदाने तातडीने सुरु करणे गरजेचे आहे. प्रशासनाने मैदाने बंद करण्याचा निर्णय मागे घेऊन तरुण युवक व लहान मुलांचे भविष्य वाचवावे अशी मागणी जितेंद्र ननावरे यांनी केली आहे.