पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील नेहमी आठवडाभर वाहतुकीने गजबजणारी रविवारची सकाळ अनोखी ठरली. सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच घरातील लहान मुले, जवळपासच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या मित्रमंडळींबरोबर रस्त्यावर उतरले. निमित्त होते सौ. अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने आयोजित ‘हॅपी स्ट्रीट पिंपळे सौदागर २०२२’ या उपक्रमाचे.
सर्व खेळांमध्ये मोकळेपणाने लहान मुलांच्या बरोबरीने उत्साहात सहभागी झालेला पालकवर्ग, कुठे झुंबाच्या तालावर थिरकणारी तरुणाई, तर कुठे रस्त्यावर मौजेचा आनंद लुटणारी बच्चे कंपनी, पादचारी मार्गावर योगासने करणाऱ्या महिला, तर कुठे रस्सीखेच जिंकण्यासाठी सुरू असलेली चढाओढ. संगीत खुर्ची, सायकलिंग, झुंबा, जेंबे वादन, बॅडमिंटन अशा विविध खेळांत हरवून गेलेल्या या नागरिकांच्या गर्दीने ‘हॅपी स्ट्रीट’चा रस्ता फुलला होता.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई काटे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे, युवा नेते निलेश काटे आणि परिसरातील सोसायटीमधील नागरिक, सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान विजेत्या भाग्यवान स्पर्धकांना टीव्ही आणि सायकल बक्षीस म्हणून देण्यात आले.
उपक्रमाबद्दल माहिती देताना अनिताताई काटे म्हणाल्या, कुणाल आयकॉन रस्त्यावर एरवी वाहनांची मोठी वर्दळ असते. नागरिकांना चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. रविवारी मात्र सकाळपासूनच वेगळेच चित्र होते. आठवडाभर येथील नागरिक हॅपी स्ट्रीट कधी येणार याची वाट बघत होते. पहाटे चारपर्यंत रस्ता नेहमीप्रमाणेच शांत होता. हॅपी स्ट्रीटचे बँनर, स्टॉल लावायला सुरुवात झाल्यानंतर तासाभरात रस्ता गर्दीने फुलला. अनेकांनी सकाळी व्यायाम म्हणून सायकलींवर फेऱ्या मारल्या. स्केटबोर्डवरून वेगाने फिरणारे विद्यार्थी, सोसायट्यांमधील लहान मुलांचे ग्रुप डॉजबॉल, फूटबॉल घेऊन आले होते. मोकळ्या रस्त्यावर त्यांचे खेळ रंगले. चिमुकल्या मुलांसह त्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक, अगदी सहकुटुंब विविध उपक्रमांचा आनंद घेत होते. रस्त्यावर झुंबा, जेंबे वादनासह रस्सीखेच, संगीत खुर्ची, चॉक आर्ट, पझल असे विविध खेळ उपलब्ध करण्यात आले होते. मित्रमैत्रिणी, नातेवाइक, सोसायट्यांमधील शेजाऱ्यांबरोबर विविध खेळ खेळताना तीन तास कधी संपले हेही अनेकांना कळले नाही. या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
युवा नेते निलेश काटे म्हणाले, ‘रविवारची सुट्टी म्हणजे उशिरा उठायचे, असे समीकरणच बनले आहे. शाळा संपल्यानंतर आपला मैदानी खेळाशी संपर्कच तुटलेला असतो. पण या उपक्रमात पुन्हा एकदा लहानपणी खेळलेल्या खेळांची मजा अनेकांनी अनुभवली. मुलांबरोबर खेळताना आम्हीही लहान होतो. बालपणातील खेळ पुन्हा खेळताना धमाल येते. आठवडभराचा ताण हलका होतो असे सहभागी पालकांनी मत व्यक्त केले. खेळीमेळीचे, उत्साहाचे वातावरण रविवारी सकाळी नागरिकांना अनुभवायला मिळाले.
आयोजक सौ. अनिताताई संदीप काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.