पिंपरी (Pclive7.com):- बैलगाडा शर्यत हे सांस्कृतिक भारताचे वैभव आहे. मात्र देशात आणि जगातील काही शक्ती भारताच्या या सांस्कृतिक वैभवाला लगाम घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

भारतातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन भोसरी विधानसभेचे आमदार तथा पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि माजी महापौर नितीन काळजे माजी महापौर राहुल जाधव यांच्या नियोजनातून चिखली येथे करण्यात आले आहे. या भव्य बैलगाडा शर्यतीला प्रकाश जावडेकर यांनी आज हजेरी लावली. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, मी जेव्हा पर्यावरण मंत्री झालो तेव्हा या बैलगाडा शर्यतीला बंदी आली होती. ही बंदी न्यायालयाचा आदेश आणि राज्यकर्त्यांमुळे आली होती. जगभरातील प्राणी मित्र संघटनांचा त्याला विरोध होता. ते सर्व प्राणी मित्र संघटनेचे पदाधिकारी माझ्याकडे आले. तेव्हा सगळे बसल्यावर मी परिचय करून घेतला आणि म्हटलं तुम्ही चांगलं काम करताय, तेव्हा तुम्ही बैल पाळत असालच ना? तर त्यापैकी एकाने देखील बैल कधी पाळलाच नव्हता. तर आमचा शेतकरी बैलपोळ्याला त्याची पुजा करतो आणि त्याच्याही पुढे जाऊन बैलाचे संगोपन, आजारपण सगळं करण्याचं काम शेतकरी करतो.
बैलगाडा शर्यत हे सांस्कृतिक भारताचे वैभव आहे. देशात आणि जगातील काही शक्ती भारताच्या या सांस्कृतिक वैभवाला लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून मी अध्यादेश काढला आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, अध्यादेश काढा या शर्यतीसाठी बैलाला शेतकऱ्यांनी कुठलंही इंजेक्शन देऊ नये. त्याला काहीही पाजू नये अशा सगळ्या अटी त्यात घातल्या. आणि बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली. तामिळनाडूमध्ये या खेळाला जलीकट्टू आणि कर्नाटकमध्ये कमला म्हणतात. तर महाराष्ट्रात बैलांची छकडा शर्यत आणि बैलगाडा शर्यत घेतली जाते.
प्राणी मित्रांनी कधी प्राण्यांची पूजा केलीय का?
बैलगाडा शर्यतीला विरोध करणारे हे सगळे प्राणी मित्र वगैरे स्वत:ला बोलतात. त्यांनी प्राण्यांची कधी पूजा केलीय का? आमची संस्कृती आहे. आम्ही बैलपोळा करतो आणि आम्ही नागपंचमी सुद्धा करतो. हिच भारतीय संस्कृती आहे असेही प्रकाश जावडेकर शेवटी बोलताना म्हणाले.
महेश लांडगेंकडून अद्भुत अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यावर सर्वत्र या स्पर्धा घेतल्या जात आहेत. मात्र आमदार महेश लांडगे यांनी या अद्भुत अशा बैलगाडा शर्यतीचे संयोजक केले आहे आहे. अपेक्षेहून अधिक बैलगाडा मालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग याठिकाणी उपस्थित राहत आहे असं सांगत प्रकाश जावडेकर यांनी महेश लांडगे आणि पूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले.