पिंपरी :- पवना धरण १०० टक्के भरल्याने १२ ऑगस्टपासून धरणातून दररोज १४०० क्युसेक्सने पाच तास पाणी विसर्ग सुरू होता. मात्र शनिवारी दुपारपासून पावसाचे जोरदार आगमन झाल्याने पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. पवना धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने धरणाचे सहा दरवाजे सहा इंचांनी उघडले असून २२०० क्युसेक्सने तर जलविद्युत प्रकल्पाद्वारे १४०० क्युक्सेस असा सुमारे ३६०० क्युसेसने पाणी विसर्ग सुरू आहे.
जूनपासून पवना धरण पाणलोट क्षेत्रात आज अखेर २ हजार ५५७ मिलीमिटर इतका पाऊस झाला आहे. आज दिवसभरात ६० मिलीमिटर इतका पाऊस झाला. यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मागील वर्षी २० ऑगस्ट २०१६ पर्यंत १ हजार ९२९ मिलीमिटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर धरण १०० टक्के भरलेले होते. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आज अखेर ६०० मिलीमिटर इतका जास्तीचा पाऊस झाला. शिवाय धरण देखील लवकर भरले. पवना नदी पाणी विसर्ग वाढल्याने दुथडी भरून वाहू लागली आहे. पवना नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाणी विसर्ग वाढवला जाऊ शकतो, अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.
सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. धरण पाणलोट क्षेत्रात पाणी वाढल्याने दुपारी एक वाजता पवना धरणाचे ४ दरवाजे सहा इंचांनी उघडले तर पावसाचा जोर दुपारी १ नंतर वाढल्याने पुन्हा दोन दरवाजे सहा इंचांनी उघडले गेले. दिवसभर जोरदार बॅटींग केल्यानंतर सायंकाळी सहानंतर पावसाचा जोर ओसरला.