पिंपरी :- डॉक्टर, परिचारकांची कमतरता, औषधांचा तुटवडा, पायाभूत सुविधांची वानवा या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) गंभीर समस्या पुन्हा एखदा उजेड्यात आल्या आहेत. पिंपरी महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज अचानकपणे पाहणी दौरा केला. रुग्णांची हेळसांड, रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबत त्यांनी प्रशासनाची कानउघडणी केली. तसेच वायसीएमची स्थिती सुधारण्यासाठी ‘सर्जिकल स्टाईक’ करणार असल्याचे ते म्हणाले.
पिंपरी महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज पत्रकारांसमवेत ‘वायसीएम’ रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका सुजाता पालांडे, वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, डॉ. रोहणी नगरकर आदी उपस्थित होते. पवार यांनी तीन तास वायसीएम रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी केली. समस्यांचा आढावा घेतला. रुग्णालयातील स्त्री रोग, अस्थिरोग, बालरुग्ण विभाग, रुग्ण वॉर्ड, सोनोग्राफी, भांडार अशा सर्व विभागांची पाहणी केली. तसेच रुग्णांची चौकशी करत रुग्णालयात मिळणा-या सुविधांबाबत विचारपूस केली.
एकनाथ पवार म्हणाले की, वायसीएम रुग्णालयाची अवस्था अंत्यत बिकट आहे. या रुग्णालयावर महापालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. मात्र, त्या तुलनेत रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. रुग्णांची हेळसांड केली जाते. वायसीएमध्ये नेहमीच औषधांचा तुटवडा असतो. सुविधांची वानवा आहे. वायसीएमध्ये अनेक त्रुटी आहेत. डॉक्टरांचे कामावर लक्ष नाही. त्यांचा केवळ खरेदीत रस आहे.
आता पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाले आहे. त्यामुळे वायसीएममध्ये सुरू असणारी काही लोकांची मक्तेदारी मोडीत काढणार आहे. आम्हाला खरेदीत रस नाही. शहरातील गोरगरिबांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. रुग्णालयातील ज्या अडचणी असतील त्या सोडविल्या जातील. मुनष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व समस्यांचे निराकण करण्यात येईल. याबाबत दोन दिवसात आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे, पवार म्हणाले.