पिंपरी :- केंद्रातील मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता राज्यातही मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यात पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांची नावे चर्चेत आहेत. त्यासाठी दोघांनी जोरदार मोर्चेबांधणी त्यांनी सुरु केली असून नेमकी कोण बाजी मारतयं हे लवकरच स्पष्ट होईल.
पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे राष्ट्रवादीचा अभेध्द गड होता. मात्र आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली सत्ता परिवर्तन झाले. महापालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलले. त्यामुळे जगताप यांना मंत्रीपद देऊन एकप्रकारे ताकद देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पॉवरफुल ताकदीमुळेच महापालिकेत भाजपला सत्ता काबिज करता आली. लक्ष्मण जगताप यांना महेश लांडगे यांची साथ मिळाली म्हणूनच सत्ता परिवर्तन शक्य झाले. सध्या लांडगे हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात. त्यामुळे मंत्रीपदाची लॉटरी त्यांना लागू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा बालेकिल्ला उध्वस्त करणार्या शहरातील या आमदारांना मंत्रीपद मिळावे ही तमाम शहरवासियांची इच्छा आहे. मंत्रीपद आले तर शहराचा विकास आणखिन वेगाने होईल असे स्थानिक भाजपच्या मंडळींचे मत आहे. त्यामुळे तुर्तासतरी पिंपरी चिंचवडला मंत्रीपदाची प्रतिक्षा आहे असचं म्हणावे लागेल.