पिंपरी (Pclive7.com):- मुखी हरिनामाचा गजर करीत, टाळ मृदुंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. कोरोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्षे हा आषाढी वारीचा पायी सोहळा संपन्न झाला नव्हता. विठ्ठलाच्या ओढीने पंढरपुरच्या दिशेने निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूकरांचा निरोप घेऊन आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मजल-दरमजल करत शहरात दाखल झाला. गळ्यात तुळशीमाळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि हातात टाळ-मृदुंग अशा थाटात पंढरीच्या दिशेने निघालेले वारकरी क्षणभर तुकोबाची लक्ष-लक्ष रुपे असल्याचा भास शहरवासियांना होत होता.

सकाळपासूनच वारकरी शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली. पालखीच्या मागे आणि पुढे दिंडया, सर्वात पुढे सनईचौघडा, नंतर तुकोबांच्या पालखीचे अश्व, मागे फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथातील महाराजांच्या पादुकांची पालखी, असा लवाजमा होता. हा भक्तीचा अनोखा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी भक्ती शक्ती चौक निगडी येथे शहरवासियांची गर्दी लोटली होती. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती-शक्ती चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.

यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, तसेच सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व दिंडी प्रमुखांना प्रथमोपचार किट, संपर्क माहिती पुस्तिका भेट देण्यात आली.
महापालिकेबरोबरच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच विविध संस्था, संघटनांचे स्वागत स्विकारत पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला. भक्तीरसात चिंब झालेले वीणेकरी, पखवाज वादक, पताकाधारी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, टाळकरी पाहून शहरवासियांना पैश्याच्या मागे धावून गमावल्या जाणार्या आत्मिक सुखाचा हेवा वाटला. भजने, हरीपाठ, गायन करत टाळ-मृंदुंगाच्या तालात नाचत मार्गक्रमण करणार्या वारकर्यांमुळे शहर भक्तीमय झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा अनेक भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. प्राधिकरण, दत्तवाडी, विठ्ठलवाडीमार्गे पालखी आकुर्डीतील गावठाणात पोहोचणार आहे. पालखीचा आज मुक्काम आज आकुर्डी येथील दत्तवाडीतील विठ्ठल मंदिरात असणार असून उद्या सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.