पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या संभाव्य खासगीकरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्य शासनाची आर्थिक मदत व तज्ज्ञ डॉक्टर मिळवून रुग्णालय महापालिकेनेेच चालवावे, अशी मागणी करत वायसीएमचे खासगीकरण करण्याचा सत्ताधारी भाजपचा कट यशस्वी होऊन देणार नाही. तसा प्रयत्न केलाच, तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी दिला आहे.
पक्षनेते एकनाथ पवार यांनी नुकतीच या रुग्णालयास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्यसेवेवर एवढा पैसा खर्च करत असूनही, त्या प्रमाणात लोक समाधानी नाहीत. यापेक्षा हे ‘वायसीएम’ रुग्णालय एखाद्या खासगी संस्थेस चालविण्यास देऊन शहरातील ५ लाख गरीब लोकांचा विमा उतरविणे योग्य ठरेल, असे सांगत त्यांनी पुढचे संकेत दिलेत. त्यांच्या या भूमिकेला मारूती भापकर यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
‘वायसीएम’ रुग्णालयात पिंपरी चिंचवड शहरासह मावळ, खेड, चाकण, आंबेगाव, मुळशी आदी परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयांत वैद्यकीय सेवा हा धंदा झाल्यामुळे गोरगरीब, शेतकर्यांसाठी हे रुग्णालय खूप मोठा आधार वाटते. येथील कामचुकार कर्मचारी, सुस्त प्रशासन व वेगवेगळे भ्रष्टाचार हे या रुग्णालयास शाप असून, त्यामुळे दर्जेदार उत्तम वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळत नसल्यामुळे लोक समाधानी नाहीत; परंतु त्यावर या रुग्णालयाचे खासगीकरणच करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर वाटतो.
कोणाला तरी डोळ्यांसमोर ठेवून विशिष्ट ठेकेदारांना पोसण्यासाठी भाजपच्या पदाधिकार्यांना घाई झाल्याचे दिसत आहे. केंद्रात, राज्यात, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. विरोधी पक्षात आसताना महापालिका व ‘वायसीएम’ रुग्णालयातील भ्रष्टाचारास कायम विरोध करणारे सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवून पारदर्शक कारभाराची घडी बसवतील, बेशिस्त कामचुकार कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारून रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना समाधान वाटेल, असे काम कराल, अशी अपेक्षा होती; परंतु तसे दिसत नाही. गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी एकनाथ पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ‘वायसीएम’ रुग्णालयासाठी विशेष बाब म्हणून भरीव आर्थिक मदत व वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्यातर्फे राज्य शासनाकडून तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकतेनुसार नियुक्ती करून घ्यावी. त्यांचा पगार राज्य शासनाकडून घ्यावा, अशा आशयाची मागणी राज्य शासनाकडून मंजूर करून घ्यावी. ‘वायसीएम’ रुग्णालयमधील प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा करावी. तेथील भ्रष्टाचाराच्या साखळ्या उद्ध्वस्त करून कारभार स्वच्छ व पारदर्शक करावा. राज्य शासनाकडून आर्थिक मदत, तज्ज्ञ डॉक्टर मिळवावेत रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा कट यशस्वी होऊन देणार नाही. तसा प्रयत्न केलाच, तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा भापकर यांनी दिला आहे.