(प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात सोनसाखळी व वाहनचोरी करणा-या चार सराईत गुन्हेगारांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ठाणे शहर येथून मोक्क्यातून फरार असलेल्या व पिंपरी येथून तडीपार असलेल्या एका महिलेचा समावेश आहे. यासंपूर्ण कारवाईत पिंपरी पोलिसांनी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मसाजी काळे, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे आदी उपस्थित होते.
काशीम उर्फ तल्लाफ मुक्तार ईराणी (वय.२० रा. सदाशिवनगर, हडपसर) हुसैनी उर्फ गजणी मुख्तार ईराणी (वय.१९ रा. पाटीलनगर चाळ, ठाणे) यातील हुसैनी हा ठाणे शहरातून मोका कलमातील फरार आरोपी आहे. तर दुस-या कारवाईमध्ये पिंपरी पोलिसांनी मतीन अकबर कुरेशी (वय.२३) आशा मतीन कुरेशी (वय २४) दोघेही राहणार मिलिंदनगर पत्राशेड, चिंचवड यांना अटक केली असून त्यातील आशा कुरेशी हिला चिंचवड परिसरातून तडीपार करण्यात आलेले आहे.
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, या कारवाईत एक सोनसाखळी चोरी, तीन वाहनचोरी आणि घरफोडीचे तीन असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये आरोपींकडून सोनसाखळी चोरीमधील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, आठ तोळ्याचे घरफोडीतील दागिने, स्क्रु ड्रायव्हर, सायकल स्टॅन्ड, एक कटावणी, चार दुचाकी असा ५ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यामध्ये आशा कुरेशी या आरोपीवर तडीपारी घोषीत करुनही हद्दीत पुन्हा गुन्हा केल्याने तिच्यावर कलम १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, सहायक पोलीस अरुण बुधकर, पोलीस हवालदार विवेकानंद सपकाळे, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, शाकीर जिनेडी, पोलीस नाईक जावेद पठाण, महादेव जावळे, संतोष दिघे, दादा धस, पोलीस शिपाई शैलेश मगर, उमेश वानखडे, रोहित पिंजकर, संतोष भालेराव, सुषमा पाटील यांनी केली आहे.