पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्याच्या कामासाठी नेमण्यात येणा-या दोन स्वंयरोजगार संस्थांना देण्यात आलेली चार महिन्याची मुदतवाढ रद्द करावी. तसेच निविदा प्रक्रिया करण्यास विलंब करणा-या संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई करावी. या मुदतवाढीत आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची दाट शक्यता असल्याचे माजी महापौर व नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील कचरा गोळा करून त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याच्या कामासाठी मे. भारत विकास गृप (बीव्हीजी) आणि क्षितीज वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस् या ठेकेदार कंपनीला महापालिकेने पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
एखाद्या कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी सुमारे ४१ दिवसाचा कालावधी लागतो. मात्र संबंधित ठेकेदारांना मुदवाढ देण्यासाठी निविदा प्रक्रिया केली गेली नसल्याची शक्यता आहे. तसेच स्थायी समितीने ३१ जुलै नंतर मुदतवाढ देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र तरीही मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची दाट शक्यता आहे, असे घोडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या दोन संस्थाना दिलेली मुदतवाढ त्वरीत रद्द करावी आणि निविदा प्रक्रीयेस विलंब करणा-या अधिकारी, कर्मचा-यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका डॉ. घोडेकर यांनी निवेदनातून केली आहे.