पुणे (प्रतिनिधी):- शेतात तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा आणि २ बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील दापोडी येथे ही घटना घडली असून यदु कोंडीबा शेळके (वय ६० वर्षे) यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यदु शेळके हे जनावरांना चारा आणण्यासाठी बैलगाडी घेवून शेतावर गेले होते. यावेळी विजेच्या खांबावरील तार शेतात तुटून पडली होती. या तारेतून विजेचा प्रवाह सुरू होता. या तारेला स्पर्श झाल्यामुळे शेळके आणि बैलांना
जोराचा विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यवत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार बापूराव बंडगर करीत आहेत.