पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्या इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे. या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार करून त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात क्रीडा संकुलात म्हशी सोडून राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी अनोखे आंदोलन करून सत्ताधारी भाजप व प्रशासनाचा निषेध केला.
विक्रांत लांडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात शहरातील खेळाडूंना सराव करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून हे मैदान उभे केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिंथेटिक ट्रॅक तयार केले. त्याचबरोबर गोलफेक, थालिफेक, लांब उडी या खेळाबरोबर इनडोअर गेमचा ही या संकुलात समावेश आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून क्रीडा प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे या मैदानाची दुरवस्था झाली आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या काळात जो विकास केला आहे. त्याची देखरेख ठेवता येत नसेल तर ही शोकांतिका असल्याचे मत व्यक्त करत सत्ताधारी भाजपा व क्रीडा प्रशासनाचा निषेध विक्रांत लांडे यांनी केला आहे.