पिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड येथील केशवनगर परिसरात डोक्यात फरशी घालून एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. राम सनेही (वय ३२ रा. मध्यप्रदेश), असे मयत कामगाराचे नाव आहे.
घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांनी हा खून दारुच्या नशेत झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. आसपासच्या परिसरात संबंधीत कामगारांना कोणीही ओळखत नाही. चिंचवड येथील केशवनगर भागात असलेल्या हॉटेल खुशबूच्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मयत इसम आणि त्याचा आणखी एक साथीदार राहत होते. येथेच आरोपीने दारुच्या नशेत भांडणात रामच्या डोक्यात फरशी घातली व त्याचा खून केला. खून करून मृतदेह ओढत नेऊन जवळच असलेल्या गवतामध्ये फेकून दिला.
हा खून रात्री झाला असून आज सकाळी परिसरातील नागरिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे. मात्र, आरोपीची ओळख व खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.