पिंपरी (प्रतिनिधी):- स्वप्नातून ध्येय ठरतात आणि ध्येयातून दिशा सापडत असते, असे प्रतिपादन पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी येथे केले. आपण निर्धारित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी चांगल्या सवयी आवश्यक असतात. असे सांगून स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी जीवनातील कोणत्याही परीक्षेत निश्चितपणे यशस्वी होतोच असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरातील दिशा सोशल फाऊंडेशनने प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या संवाद तरूणाईशी या उपक्रमातंर्गत ‘स्पर्धा परीक्षेची पुर्व तयारी व प्रशासनातील संधी’ या विषयावर मुंढे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, समन्वयक नाना शिवले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या धडाकेबाज शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांनी, तितक्याच रोखठोक शैलीत करिअर मार्गदर्शन, करिअर समुपदेशन व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले. घोकंपट्टी न करता नियोजनपूर्वक सखोल अभ्यास करा, ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने आत्मविश्वासाने वाटचाल करा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मुंढे म्हणाले, उच्च ध्येयाचे स्वप्न साकार होण्यासाठी मनातील ज्योत पेटावी लागते. परिस्थितीवर स्वार झाले तरच यश मिळते. पुढे येण्याची, काही तरी बनण्याची महत्वाकांक्षा ठेवा. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना जोपासा. एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा एकच ध्येय ठरवा आणि त्यात पुर्णत्वाने स्वत:ला झोकून द्या. सकारात्मक विचार करा. प्रामाणिक प्रयत्न करा. प्रश्नांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने पुस्तके वाचा. परीक्षेची भीती बाळगू नका. आत्मविश्वासाने सामोरे जा. कॉपी करणे आणि अंदाजे लिहिणे टाळा. तयारी आणि अचुकतेला परीक्षेत अत्यंत महत्व असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज यांनी केले. सचिन साठे यांनी आभार मानले. गुरूदास भोंडवे, विजय कांबळे, राजेंद्र करपे, संतोष बाबर, अविनाश ववले, डॉ श्याम अहिरराव, किशोर जवळकर, अतुल शिंदे, मनोज टंकसाळे, बाजीराव लोखंडे, नंदू कांबळे, रोहित खर्गे, राजेश सावंत, महेंद्र चिंचवडे, प्रविण कुदळे, गणेश लंगोटे यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.