पिंपरी :- पुणे-लोणावळा तिसरा व चौथा ट्रॅक तयार करण्याच्या कामाचे सर्वेक्षण चार महिन्यात पूर्ण होऊन फेब्रुवारीपर्यंत रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया काढण्यात येईल, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक देवेंद्रकुमार शर्मा व पुणे विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक दादाभोये यांच्या उपस्थितीत पुणे येथे रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत नुकतीच बैठक झाली. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, पुणे क्षेत्रीय विभागाचे खासदार, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मावळ मतदार संघातील लोणावळा ते पुणे या मार्गावरील प्रलंबित मागण्याचा सातत्याने पाठपुरावा मी करत आहे. रेल्वे विभागाचे अधिकारी व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी रेल्वेसंबंधी अनेक प्रश्न मार्गी लावले असून काही प्रश्न प्रगतीप्रथावर असल्याचे सांगितले.
पुणे-लोणावळा तिस-या ट्रॅक बरोबरच चौथ्या ट्रॅकचा अंतिम सर्वे रिपोर्ट करण्याची कार्यवाही चालू आहे. हा रिपोर्ट येत्या फेब्रुवारी २०१८ पर्यंत पूर्ण होऊन रेल्वे मंत्रालयाला पाठवला जाईल. त्यानंतर मंत्रालयाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये १२ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाची जबाबदारी राज्य शासन व रेल्वे विभागाने घेतली आहे.
लोणावळा स्टेशनचा ‘क’ श्रेणीमध्ये समावेश केला असून प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळा स्टेशनवर दोन एक्सलेटर बसवण्यात येणार आहे. त्यातील एक एक्सलेटर ऑक्टोबर २०१७ च्या दरम्यान बसवले जाईल. डिसेंबरपर्यंत दुस-या एक्सलेटरचे काम चालू होईल. लोणावळा गेट नंबर ३० येथील ओव्हर ब्रिज व गेट नंबर ३२ भांगरवाडी येथील भूमिगत रस्त्याला रेल्वे विभागाने मंजुरी दिली असून लोणावळा नगरपालिका यांच्या माध्यमातून हे काम लवकर सुरू होणार आहे. यासाठी ५०% खर्च लोणावळा नगरपालिका करणार असून लवकरच याही कामाची सुरुवात होणार असून त्यामध्ये नगरपालिकेने त्यामध्ये लवकरात लवकर पुढाकार घेऊन काम मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे, असे रेल्वे विभागाने सांगितले आहे.
तळेगाव नगरपालिका हद्दीतील पोल क्रमांक ५१ या सबवेसाठी रेल्वे विभागाने १० जून २०१७ रोजी मंजुरी दिली असून तळेगाव नगरपालिका याची निविदा काढून काम पूर्ण करणार आहे. वडगाव केशवनगर येथील गेट नंबर ४९ सबवेसाठी पुणे रेल्वे विभागाने १.५६ करोड रुपयाचे इस्टीमेट केले आहे. पुढील आर्थिक बजेटमध्ये या कामास तरतूद ठेवून काम केले जाणार असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
चिंचवड, पिंपरी, आकुर्डी या स्टेशनवरील सुविधांबाबत कार्यवाही चालू असून प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था खासदार श्रीरंग बारणे यांच्या फंडातून चिंचवड स्थानकावर केली आहे. त्याचप्रमाणे पादचारी रेल्वे पुलाची रुंदी वाढवली असून त्यावर संरक्षक छत टाकण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मची उंची व लांबी वाढविण्याचे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच बारणे यांच्या खासदार फंडातून पुणे लोणावळा लोकलमधील महिलांचे छेड-छाडीचे प्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून त्या साठीचा सर्व निधी बारणे यांनी रेल्वे विभागाला हस्तांतर केला आहे. कान्हेफाटा, वडगाव, घोटावडी, कासारवाडी या रेल्वे स्थानकांवर सुविधा देणार असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आल्याचे बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.