पिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड नवरात्र महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या ढोल-ताशा आणि पांरपरिक वाद्यांचा तालघोष या तबला समूहवादनाच्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक कलाकरांनी एकाचवेळी एकत्र अगदी सुरात ढोल-ताशाचे वादन केले. ढोलताशाची पाच पथके सहभागी झाले होती. ढोल-ताशा पथकांनी सादर केलेल्या वादनाने उपस्थितांची मने जिंकली.
चिंचवड बस स्टॉप जवळील चापेकर चौकाजवळील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, ‘ब’ प्रभागाचे अध्यक्ष सचिन चिंचवडे, शिवसेनेचे भगवान वाल्हेकर, शेखर चिंचवडे, रवी नामदे, गजाजन चिंचवडे आदी उपस्थित होते.
पारंपारिक वाद्यांच्या संस्कृतीची जोपासना केल्याबद्दल ताशा प्रशिक्षक ज्ञानप्रबोधिनीचे राजण घाणेकर, ढोल-ताशांचे व्यापारी जीवन काकडे आणि ढोलताशा महासंघ पुणे यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, डीजेचा वापर टाळणे गरजेचे आहे. डीजेमुळे ध्वनीप्रदूषण होते. सरकारनेही डीजेवर पूर्णतः बंदी घातली आहे. पारंपरिक वाद्याचा जास्तीत-जास्त वापर करणे गरजेचे आहे. चिंचवड नवरात्र महोत्सावात दरवर्षी पारंपरिक वाद्याचा वापर केला जातो. पारंपरिक वाद्याचा वापर करण्याची जनजागृती देखील केली जाते, हे कार्य कौतुकास्पद आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शिवाज्ञा ढोल-ताशा पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक, पुण्यातील नुमवि वाद्यपथक, श्री शिव दुर्गा ढोल-ताशा पथक, एक दिल ताशा पथक सहभागी झाले होते. प्रत्येक पथकामध्ये ६० ढोलांचा समावेश होता. पाच ढोल-ताशा पथकामधील एकूण तब्बल ३०० ढोल ताशाचे वादन झाले. रात्री दहा वाजता ढोल-ताशा वादनाची सांगता झाली. ढोल-ताशा पथकांनी सादर केलेल्या वादनाने उपस्थितांची मने जिंकली.
चिंचवड नवरात्र महोत्सवाअंतर्गत गेल्यावर्षीही ताल-घोष कार्यक्रममध्ये सामूहिक तबला वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गणेश गोलांडे, दत्तात्रय संगमे यांनी संयोजनात पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूंत्रसचालन पुजा पाखरे यांनी केले. तर, प्रास्ताविक व आभार महेश बारसावडे यांनी मानले.