पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या ओम मोहन खरात (वय, ९, रा. पूर्णानगर, चिखली) याची सोमवारी सायंकाळी साडे आठच्या सुमारास तब्बल सुखरूप सुटका करण्यात आली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे पोलिस संदीपला सुखरूप सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते. आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
ओम संदीप खरात (वय ७) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून त्याच्या सुटकेमुळे खरात कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसहित ओम आणि त्याचे कुटुंबीय हजर होते.
ओम खरात याच्या सुटकेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसहित सुमारे ४०० पोलीस या शोध मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. निगडीच्या केरळ भवन येथून या शोध कार्याची सूत्रे हलविण्यात येत होती. या ठिकाणी दोन अतिरिक्त पोलीस आयुक्तांसहित अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी तळ ठोकला होता. अपहरणकर्त्यांनी खरात कुटुंबीयांकडे ओमच्या सुटकेसाठी ६० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अपहरणकर्त्यांनी आपल्याला गाडीच्या डिकीमध्ये ठेवले होते असे स्वतः ओम याने सांगितले.
पोलीस आपला माग काढत असून मोबाइलच्या लोकेशनवरून आपला शोध घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी ओमची सुटका करून तेथून पळ काढला. मात्र अपहरणकर्त्यांबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
ओमची सुटका झाल्याच्या आनंदात निगडीच्या एका बेकरी मालकाने खास ओमसाठी केक आणला होता. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ओमला स्वतःच्या हाताने केक भरवला. यावेळी ओमचे वडील संदीप खरात यांनी पोलिसांचे आभार मानून पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.