पिंपरी (Pclive7.com):- रुपीनगर येथील एकता चौकात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या अमर हुतात्मा स्मरण गणेश विसर्जन कुंडास गणेश भक्तांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
गणेश उत्सवातील दहा दिवसात पाच हजारहून अधिक गणेश भकतांनी या विसर्जन कुंडास भेट देऊन घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केले.
सुदर्शन मित्र मंडळ, समर्थ मित्र मंडळ, विनायक मित्र मंडळ, मोरया, सिद्धनाथ, राजमाता जिजाऊ, नवयुग, ईगल मित्र मंडळ आदी सार्वजनिक मंडळांनी ढोल ताशा आणि डिजेच्या तालावर भव्य अशी गुलाल विरहित मिरवणूक काढली. शिवशंभो हौसिंग सोसायटी मधील सुदर्शन मित्र मंडळाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. महिलांचा जास्तीत जास्त सहभाग यामध्ये दिसून आला. सर्व महिलांनी फेटे बांधून एकसारखा पारंपारिक पोशाख परिधान केला होता. डिजेच्या तालावर सर्व गणेश भक्तांनी धूमधडाक्यात विसर्जन मिरवणूक काढली. महिलांच्या शुभहस्ते गणरायाची आरती करण्यात आली. या मंडळाने गणेश उत्सवात मुलांसाठी शैक्षणिक आणि क्रिडाविषयक उपक्रम राबविले. विविध स्पर्धा घेऊन मुलांना बक्षिसवितरण ही करण्यात आले.
रात्री बारा पर्यंत शिवशंभो हाउसिंग सोसायटी ते रुपीनगर बसस्टॉप या मार्गावर मिरवणूक संपन्न झाली. परिसरातील माजी नगरसेवक आणि नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी बिभीषण पोकळे, प्रमोद जाधव, ओम भालेकर, योगेश दानवले, महेंद्र जाधव, प्रतीक मालुसरे आदी उपस्थित होते. रुपीनगर मधील तृती पंथीय भाविकांनी ही मनोभावे गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
रुपी नगर तळवडे परिसरात या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमाबद्दल माजी नगरसेविका पौर्णिमाताई सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र आप्पा सोनवणे आणि मित्र परिवाराचे परिसरातील सर्व नागरिकांनी कौतुक केले. या उपक्रमात योगेश सोनवणे, गजानन पाटील, प्रदीप गोरे, राजू नातू, महेंद्र शिंदे, गजानन काळे, स्वप्नील काळे, शार्दुल, आमले, अक्षय देवळे आदी गणेश भक्तांनी परिश्रम घेतले.