मावळ (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) कार्ला येथील एकवीरा गडावर जात एकवीरादेवीचे दर्शन घेतले.
गेली दोन वर्षे नवरात्र उत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट होते. त्यामुळे साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने उत्साही वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. आई एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पाचव्यादिवशी कार्यकर्त्यांसह गडावर जात देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर, पिंपरी विधानसभेच्या महिला संघटिका सरिता साने, अंकुश देशमुख, राजेंद्र तरस, दत्ता केदारी, सुनील हुलावळे, अंकुश कोळेकर, दिपक गुजर, माऊली घोगरे, रोहित माळी, शैला पाचपुते आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”मागील दोन वर्ष कोरोनामुळे देवीचा नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला (लोणावळा) गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल जात आहे. देवीचे मंदिर व चौघड्यांला आकर्षक फुलांचे डेकोरेशन करण्यात आले असून गड परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोप-यातून देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गडावर येत आहेत. भाविकांनी शांततेत दर्शन घ्यावे. गोंधळ करु नये, उत्सवाला गालबोट लागेल असे कोणी वागू नये. शांतता पाळावी” असे आवाहनही त्यांनी भाविकांना केले.