चाकण (Pclive7.com):- यंदाच्या पावसाळ्यात जागोजागी खड्डे पडल्याने व रस्ता उखडल्याने खराब झालेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश आले असून नुकतीच खेड तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे लवकरच पूर्ण होऊन वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही काळापासून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील मोठे-मोठे खड्डे आणि अनेक ठिकाणी उखडलेला रस्ता यामुळे सातत्याने अपघात होत होते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १०१५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु त्यानंतर या रस्त्यावर एलिव्हेटेड मार्ग बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यामुळे या एलिव्हेटेड रस्त्याचा डीपीआर तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास वेळ लागणार असल्याने खासदार डॉ. कोल्हे यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर व पुणे शिरूर या दोन्ही महामार्गांची तातडीची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दुरुस्तीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर केला होता.
खरं तर ऑक्टोबर महिन्याच्या मध्यातच तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे शिरुर या दोन्ही महामार्गावरील दुरुस्तीची कामे सुरू होणे अपेक्षित होते. परंतु यंदा पावसाळा दीर्घकाळ लांबल्याने दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नव्हते. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पावसाळा थांबल्याचे दिसताच तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश खासदार डॉ. कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिलिंद बारभाई यांना दिले होते. त्यानुसार दुरुस्तीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून मावळ तालुक्यातील रस्ता दुरुस्ती झाल्यानंतर आज खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ज्याठिकाणी रस्ता पूर्णतः खराब झाला आहे, त्याठिकाणी खड्डे बुजवून उखडलेल्या संपूर्ण भागाचे डांबरीकरण करण्यात येणार असून या दुरुस्तीसह देखभालीची जबाबदारीही सदर कंत्राटदारावरच असल्याने आगामी काळात रस्त्यांची वेळोवेळी दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे रस्ता सुस्थितीत होऊन वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
Tags: ChakanDr. Amol KolhencpRoad RepairShikrapurShirur LoksabhaTalegavखासदार डॉ. अमोल कोल्हेखासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला यशचाकणतळेगावतळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवातप्रयत्नांना यशरस्ता दुरुस्तीचे कामराष्ट्रवादी काँग्रेसशिक्रापूरशिरूर लोकसभा























Join Our Whatsapp Group