आखाती देशात गेलेल्या मुलांबाबत पालकांनी सतर्क रहावे – आमदार उमाताई खापरे
पिंपरी (Pclive7.com):- आखाती देशांमध्ये नोकरी, शिक्षणानिमित्त गेलेल्या मुलांनी व त्यांच्या पालकांनी कायदेशीर बाबींची पूर्ण माहिती घेऊन तसेच परदेशात जाण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या एजन्सीची खात्री करून घ्यावी अन्यथा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे याबाबत लोकांनी जागरूक रहावे असे आवाहन आमदार उमाताई खापरे यांनी केले.

महाराष्ट्रातील सागर सुभाष संकपाळ (वय 28) हा नाशिक येथील एका एजन्सी मार्फत कुवेत मध्ये नोकरी करण्यासाठी 15 सप्टेंबर 2022 रोजी गेला होता. त्याच्यावर तिथे गेल्यानंतर अनेक कायदेशीर प्रसंग उदभवले, यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली व त्याचे कागदपत्र व मोबाईल जप्त केले. त्याचा भाऊ रोहित याच्याशी त्याचा संपर्क होत नव्हता, त्यानंतर त्याने आमदार उमाताई खापरे यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची मागणी केली. उमाताई खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून सागरला मदत करण्याबाबत विनंती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याचे आमदार खापरे यांना सांगितले. त्यानंतर आमदार खापरे यांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी विदेश मंत्रालयाशी संपर्क साधून लिखित तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन विदेश मंत्रालयाने कुवेत येथील भारतीय दुतावासाशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत सागर संकपाळ याला गुरुवारी कुवेत येथून विमानाने पुण्याकडे पाठवले. सागरची सुटका करण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी नाशिक मधील संबंधित एजन्सीने कर्तव्य तत्परता दाखवली नाही. याबाबत आपण या एजन्सीवर कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून करणार आहोत अशी माहिती आमदार खापरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सागर संकपाळ याने स्वतःवर उद्भवलेल्या या प्रसंगाबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझे शिक्षण आयटीआय झाले असून मी यापूर्वी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये नोकरी केली आहे. मागील वर्षी नोकरी डॉट कॉम या वेब पोर्टलची संपर्क करून कुवेत मध्ये बेडींग ऑपरेटर या पदासाठी अर्ज केला होता. नाशिक मधल्या संबंधित एजन्सीने मला कुवेत मधील एका कारखान्यात 15 सप्टेंबर 2022 ला नोकरीसाठी पाठवले. त्यानंतर 16 सप्टेंबर पासून पुढे दीड महिना मी काम केले. त्यानंतर कंपनीने मला पंधरा दिवसाचा पगार दिला. माझी तब्येत खालवल्यामुळे मला तेथील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मी कुवेत मध्ये रस्त्यावर फिरत असताना मला पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला नेले. यानंतर माझ्या कुटुंबीयांशी माझा संपर्क तुटला, पोलिसांनी माझे सर्व कागदपत्र व मोबाईल जप्त केले. यानंतर माझी रवानगी जेलमध्ये करण्यात आली. दरम्यानच्या काळात मला पोलिसांनी मारहाण केली. काही दिवसानंतर माझा मोठा भाऊ रोहित याने आमदार उमाताई खापरे यांच्याशी संपर्क करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत माझी सुटका झाली. मी उमाताई खापरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऋण आयुष्यभर विसरणार नाही असे सागर संकपाळ यांने सांगितले.
सागरचा भाऊ रोहित याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सागर जोपर्यंत भारतात होता तोपर्यंत त्याचे वागणे एकदम नैसर्गिक होते. कुवेतला गेल्यानंतर तो जेव्हा जेव्हा माझ्याशी फोनवर बोलत होता त्यावेळी तो नेहमी भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे मला जाणवत होते. त्याच्याशी संपर्क बंद झाल्यानंतर त्याच्या खोलीतील त्याचा सहकारी याच्याशी मी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधला. त्यानंतर त्याने सांगितले की, सागर कुठेही भेटत नाही तो कोणाशी संपर्क साधत नाही काय झाले आम्हाला माहित नाही. यानंतर मी आमदार उमाताई खापरे यांच्या चिरंजीवाशी संपर्क साधला. नंतर आमदार खापरे यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता ताबडतोब कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत माझ्या भावाला सुखरूप पणे पुन्हा पुण्यात आणण्यासाठी मदत केली. आमचे संकपाळ कुटुंबीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार उमाताई खापरे यांचे ऋण व्यक्त करीत आहे.
आमदार खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय दूतवास आणि कुवेत मधील दूधवासाचे आभार व्यक्त केले.

























Join Our Whatsapp Group