पिंपरी (Pclive7.com):- सदनिकांचा ताबा न देता ३५ जणांची सुमारे चार कोटी १४ लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या बांधकाम व्यावसायिकास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडा विरोधी पथकाने नागपूर येथून अटक केली आहे.

हिंजवडीजवळील नेरे गावात ‘द व्हिलेज रेसिडेन्सी’ या सोसायटीत ३५ जणांचे पैसे घेऊन सदनिकांचा ताबा न देता बांधकाम व्यावसायिक व त्याचे सहकारी पसार झाले होते. प्रतिक ओमप्रकाश आगरवाल (रा. बाणेर, पुणे) असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव आहे. किरण कुंभारकर व विनय बोरीकर ( दोघेही रा. हिंजवडी) अशी इतर आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नेरेगावात २०१८ मध्ये ‘द व्हिलेज रेसिडेन्सी’ ही सोसायटी उभारण्यात आली. सदनिकाधारकांना खरेदीखत करून देण्यात आले. मात्र, सदनिकांचा ताबा न देताच आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. मात्र, दोन वर्षांपासून आरोपी पसार होते.
मुख्य आरोपी आगरवाल रांची येथे बस्तान बसवण्याचा मार्गावर असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली. रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपीला नागपूर येथून अटक करण्यात आली. गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांच्या नेतृत्वाखाली हजरत पठाण, प्रवीण तापकीर, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सोपान ठोकळ, गणेश मेदगे, सुनील चौधरी, मयूर दळवी, नितीन गेंगजे, सुनील कानगुडे, नागेश माळी, पोपट हुलगे या पथकाने ही कामगिरी बजावली.






















Join Our Whatsapp Group