पिंपरी (Pclive7.com):- जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून करण्यात आला. चिखली जाधववाडी येथील बैलगाडा घाटात शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी पाच तासात चौघांना जेरबंद केले आहे. सूरज ऊर्फ सोन्या संदीप शिंदे, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा मित्र किशोर दत्तात्रय सोनवणे (१८, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आदित्य पाटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे आणि एक अल्पवयीन मुलगा यांना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर सोनवणे आणि त्यांचा मित्र सूरज शिंदे हे शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जाधववाडी येथील बैलगाडा शर्यत घाट येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. सूरज शिंदे याच्याशी झालेल्या जुन्या भांडणाचा आदित्य पाटोळे याला राग होता. त्या रागातून आदित्य पाटोळे याने इतर आरोपींसह मिळून पालघन व तलवारीसारख्या लोखंडी पट्टीने मारून सूरज शिंदे याचा निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी पळून गेले होते.
आरोपी हे निघोजे परिसरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, चिखली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपींचा निघोजे परिसरात शोध घेतला. आरोपी हे निघोज येथील बैलगाडा घाट येथे अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले असता सहायक पोलिस निरीक्षक राकेश गुमाने व पथकाने अंधारात पाठलाग करून आरोपींना पकडले. चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट, चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर, पोलिस निरीक्षक राजेंद्र बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.
Tags: Chikhali PoliceCrime NewsPcmc Crimeखुनाचा तपास पाच तासातखूनचिखली पोलीसतरुणाचा खूनपिंपरी चिंचवड पोलीस






















Join Our Whatsapp Group