पिंपरी (Pclive7.com):- रावेत पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, एक चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी विनोद निजप्पा गायकवाड (३५, रा. रमाबाईनगर, रावेत) आणि अक्षय प्रभाकर साबळे (रा. काळभोरनगर, आकुर्डी) हे गुन्ह्यानंतर फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जाधववस्ती, रावेत परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि वापरातील कार जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक. हृषीकेश घाडगे, पोलिस उपनिरीक्षक राहुल खिळे यांच्या तपास पथकाने केली. तपास सुरू असून आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group