पिंपरी (Pclive7.com):- डोंबिवली येथील एका रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने सोमवारी (दि.२०) एकदिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे सकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी (दि. २१) सकाळी ६ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा बंद राहणार असल्याची माहिती आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आयएमए पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेचे अध्यक्ष डॉ. सुधीर भालेराव, सचिव डॉ. विकास मंडलेचा, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद सोनावणे, डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, डॉ. सुहास लुंकड आणि डॉ. मंदार डोईफोडे यांनी याबाबत माहिती दिली. मात्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, प्रसूती सेवा तसेच अतितातडीच्या उपचार सेवा नियमित सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डोंबिवली येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करताना आयएमएने डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टर हा केवळ व्यवसाय करणारा व्यक्ती नसून रुग्णांसाठी आशेचा किरण असतो. जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब असून अशा घटनांमुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

रुग्णालये ही उपचार व सेवेसाठीची ठिकाणे असून ती संघर्षाची केंद्रे बनू नयेत, अशी भूमिका आयएमएने मांडली. उपचारादरम्यान अनपेक्षित घटना घडल्यास किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्यास संतप्त प्रतिक्रिया उमटू शकतात, मात्र हिंसक मार्ग स्वीकारणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करत डोंबिवलीतील हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयएमए पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेने केली आहे. तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group