पिंपरी (Pclive7.com):- मुंबई इंडियन्स विरुद्ध हैद्राबाद सनराईज क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. काळेवाडीत बंद फ्लॅटमध्ये आरोपी हरीश दयालदास गुलानी आणि कमल गुरूमुखदास सचदेव हे दोघे सट्टा घेत होते. बुकींच्या मोबाईलमध्ये क्रिकेट लाईव्ह गुरू नावाचे ऍप आढळले आहे. टीव्ही प्रक्षेपणाच्या अगोदर त्या ऍपवर काही सेकंद सामना दिसायचा याचा फायदा घेऊन आरोपी सट्टा घ्यायचे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध हैद्राबाद सनराईज क्रिकेट सामन्यावर काही जण बेटिंग घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांना मिळाली.
त्यानुसार, काळेवाडी विजयनगर येथील अदी अम्मा ब्लेस हौसिंग सोसायटीत पहिला मजला फ्लॅट नंबर १०३ मध्ये सट्टा घेणाऱ्या गुलानी आणि सचदेव ला ताब्यात घेतले. तीन मोबाईल, एक नोटबुक, जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण २५ हजारांच्या मुद्देमाल आरोपीकडून पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.