नवी दिल्ली (Pclive7.com):- महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट उद्या (गुरुवार) निकाल देणार आहे. त्यामुळे शिंदे सरकार राहणार की जाणार याचा फैसला उद्याच कळणार आहे. तसेच १६ आमदार अपात्र ठरणार की पात्र ठरणार याबद्दल निकाल येणार आहे. त्यामुळे उद्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना धनुष्यबाण पक्ष चिन्ह आणि शिवसेना पक्ष नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून याप्रकरणी उद्याच निकाल जाहीर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी जाहीर केलं आहे. उद्या दोन घटनापीठाचे निकाल जाहीर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या वर्षी ३० जून रोजी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.