पिंपरी (Pclive7.com):- मराठी माणूस अमेरिकेत राहूनही आपल्या मातृभाषेचा प्रचंड आणि सार्थ अभिमान बाळगतो, आपल्या मातृभाषेचे, मातृभूमीचे अनंत उपकार कायम लक्षात ठेवतात, ही गोष्ट निश्चितच भूषणावह आणि अभिनंदनीय आहे. असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ते गीता दिघे (बर्गे) लिखित ऋतू अंतरीचा, या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी कवयित्री गीता दिघे यांचे आई- वडील लक्ष्मी दिघे, ह.भ.प. नारायण दिघे, सासू सासरे विजया बर्गे, सुभाष बर्गे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, उद्योजक महेश बारणे, प्रकाशक नितीन हिरवे, पांडुरंग दिघे, संदिप दिघे आदी उपस्थित होते. यावेळी पुस्तक प्रकाशन खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे पुढे म्हणाले की, नोकरी- व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने अनेक वर्षे मायभूमीपासून दूर परदेशात राहणाऱ्या आपल्या मराठी लोकांचे मराठीवरचे प्रेम जसेच्या तसे मनात कायम आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहे. कर्मभूमी वेगळी असली तरी कवयित्री गीताने मायभूमीला हृदयात साठवून ठेवले. लहानपणापासून मनात साठवलेल्या अनेक गोष्टी, घटना, ज्यांच्या संस्कारछायेत लहानाचे मोठे होतो, त्या आठवणी, कृतज्ञता या साऱ्या गोष्टी कवितेच्या रूपाने ऋतू अंतरिचा या काव्यसंग्रहात मांडल्या आहेत.

नाना शिवले म्हणाले, शालेय जीवनात जर वाचनाची आणि वाचलेल्या गोष्टींवर विचार करण्याची आवड निर्माण झाली तर निश्चितच दिशादर्शक काम घडते. आपण घेतलेले अनुभव, आठवणी या शब्दबद्ध करत, सतत वाचन करत, सुचेलले विचार नेमक्या शब्दात मांडत गीता यांनी लेखन केले आहे. आयुष्याचा प्रवास करताना माणसाने मागे वळून पाहिले तर आठवणींचा खजिना आपल्याबरोबर असल्याचे लक्षात तर येतेच, शिवाय याच शिदोरीवर आपण मोठे झाल्याची जाणीवही होते. ऋतू अंतरिचा म्हणजे कवयित्री यांनी व्यक्त केलेली एक प्रकारची कृतज्ञताच होय.

कवयित्री गीता दिघे म्हणाल्या, एक भारतीय, एक मराठी म्हणून माझे अस्तित्व मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. मी जरी विदेशात असले तरी माझे मराठीवरील प्रेम कायम राहील. कारण तिच्यामुळेच मी माझ्या जीवनाचा पाया रचू शकले. माझ्या आई-वडिलांच्या छत्रछायेखाली मला गाथा, ज्ञानेश्वरीचे आणि अनेक धार्मिक ग्रंथांचे विचार व संस्कार मिळाले. आई-वडिलांचे, मातृभाषेचे आणि माझ्या भारतभूमीचे ऋण मी आयुष्यात विसरणार नाही. ऋतू अंतरीचा हा काव्यसंग्रह प्रकाशित करून मी माझे अंतर्मन रसिकांसमोर मांडले आहे, ते माझ्या रसिकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.
प्रकाशक नितीन हिरवे म्हणाले, कवयित्री गीता यांचा कवितेबद्दलचा आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक कवितेतून वाचताना अनुभवायला मिळतो. या कवितासंग्रहातील सर्व कविता वाचकांना नक्कीच आपल्या वाटतील. गीताला या कवितासंग्रहासाठी त्यांचे शालेय जीवनातील शिक्षक श्री.नाना शिवले सरांचे मार्गदर्शन लाभले. दिघे यांना साहित्याची रिद्धी सिद्धी प्राप्त झाली असून त्यांचे कवितालेखन असेच बहरत राहो. परदेशात राहूनही त्यांचे मराठीप्रेम अधिक भावते.
महेश बारणे म्हणाले, दिघे कुटुंबाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून संघर्ष करत नोकरी करण्यासाठी त्यांच्या मुळगाव भिवडी तालुका पुरंदर येथून त्यांची मावशी लक्ष्मीबाई चंदू बारणे म्हणजेच आमची आजी यांच्याकडे थेरगाव येथे आले. गीताने अभ्यासामध्ये व इतर कलागुणांची आवड जपत आयटी क्षेत्रामध्ये काम करत असताना अमेरिकेमध्ये काम करण्यासाठी गेली. परंतु तेथेही आपले संस्कार व संस्कृती या मूल्यांची जपणूक केली. याचा मला अभिमान वाटतो.
संदीप दिघे यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग दिघे यांनी सूत्रसंचालन केले. रोहित बर्गे यांनी आभार मानले.
Tags: Geeta DigheNana ShivleShrirang Barneऋतू अंतरीचाकवितासंग्रहाचे प्रकाशनखासदार श्रीरंग बारणेखासदार श्रीरंग बारणे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्तीगीता दिघे (बर्गे)नाना शिवले






















Join Our Whatsapp Group