पिंपरी (Pclive7.com):- जमिनीच्या वादातून भावकीतल्या चौघांनी बहीण भावाला बेदम मारहाण केली. यामध्ये भाऊ गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार भोसेगाव, चाकण येथे रविवारी (दि.४) रात्री घडला.
याप्रकरणी किरण दत्तात्रय होगजे (२९, रा. भोसे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चंद्रकांत दिनकर होगजे, महिला आरोपी, कार्तिक चंद्रकांत होगजे, निशीकांत चंद्रकांत होगजे (सर्व रा. भोसे, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चंद्रकांत याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जमिनीवरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांची चुलत बहीण आणि तिच्या मुलीला मारहाण केली. त्या वेळी फिर्यादी त्यांना सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना काठीने, लोखंडी सळईने मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांचा सख्खा भाऊ व चुलत भाऊ यांनाही आरोपींनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.