आरक्षित जागा विकसित करून खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे; माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- शहर परिसरात खेळाच्या मैदानांची नितांत गरज असताना केवळ महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पिंपळे गुरवमधील खेळाच्या मैदानाचे आरक्षण गेल्या आठ वर्षांपासून विकसित होऊ शकलेले नाही. परिणामी ही जागा वाहन पार्किंग बनले आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरित ही आरक्षित जागा विकसित करून पिंपळे गुरवकरांना खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पिंपळे गुरवमधील आरक्षण क्रमांक 344, 344 (अ), 347 ही जागा महापालिकेने खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली असून, सन 2012 ते 2017 दरम्यान तत्कालीन महापौर शकुंतला धराडे व तत्कालीन नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या कार्यकाळात सदर खेळाच्या मैदानाचा आराखडा तयार करण्यात आला. तत्कालीन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात साडेतीन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. तसेच 2015 मध्ये या आरक्षित जागेला सीमाभिंत बांधण्यासाठी निविदाही काढण्यात आली होती. या आरक्षणाच्या जागेत खेळाच्या मैदानासोबतच रस्त्याच्या बाजूला व्यापारी गाळ्यांचे नियोजन असल्याने महापालिकेला आर्थिक उत्पन्नही सुरू होऊ शकणार आहे. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे खेळाच्या मैदानाचे आरक्षण विकसित होण्यापासून रखडले आहे.
आज खेळाच्या मैदानाची गरज असताना हे आरक्षण अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडले आहे. ज्याला पाहिजे तसं या जागेचा वापर होत आहे. अंधाराचा फायदा घेत रात्री कित्येक दारुडे दारू पिण्यासाठी या जागेत बसतात. त्यामुळे या आरक्षणाच्या जागेला सीमाभिंत घालण्याची गरज निर्माण झाली आहे. एखादा अनुचित प्रकार घडून गेल्यानंतर महापालिकेला जाग येऊन उपयोग नाही. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांनीच या खेळाच्या मैदानाच्या आरक्षणाकडे लक्ष देऊन खेळाचे मैदान विकसित करण्यात यावे.
आरक्षण क्रमांक 344, 344 (अ), 347 ही जागा महापालिकेने खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली असून, सन 2012 ते 2017 दरम्यान आपण नगरसेवक असताना तत्कालीन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या कार्यकाळात सदर खेळाच्या मैदानाचा आराखडा तयार करण्यात आला. तसेच त्यासाठी अर्थासंकल्पात साडेतीन कोटी रुपयांची तरतूदही केली होती. तसेच तत्कालीन महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. आरक्षणात बाधित रहिवाश्यांना मोबदलाही दिला आहे. एकंदरीत सर्व अडथळे दूर करीत हे आरक्षण टाकण्यात आले होते. मात्र, केवळ महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गरज असतानाही हे खेळाचे मैदान विकसित होऊ शकलेले नाही. खेळाचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनीच हे आरक्षण विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे.– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस