पिंपरी (Pclive7.com):- उपसूचना ऐंनवेळी दाखल करणे, सर्पोद्यानातील मगरी-साप चोरी प्रकरणातील गौडबंगाळ, ‘महाराष्ट्र ओपन’ टेनिस स्पर्धेला महापालिकेकडून ५ कोटींचे अनुदान देण्यावरून घेण्यात आलेले मतदान, नेहरूनगर येथील स्वच्छतागृह पाडल्याचा आरोप अशा अनेक मुद्द्यांवरून पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलाच गोंधळ झाला. सत्ताधारी भाजपा आणि विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. सभेच्या सुरूवातीलाच पहिल्या विषयावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये वादंग सुरू झाला. उपसूचना न वाचताच मंजूर करू नका, किमान त्या प्रभागातील नगरसेवकांना तरी तो विषय समजला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली. त्यावर स्थायी समिती सभापती यांनी अशा उपसूचना मंजूर करण्याची पध्दत आम्ही राष्ट्रवादीकडूनच शिकलो असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे वादला सुरूवात झाली.
उद्यान विभागाच्या वतीने गुलाबपुष्प उद्यानाजवळील मोकळ्या जागेत प्राणी संगोपन केंद्र उभारण्याच्या कामातील तरतुदीत वाढ करण्याचा प्रस्ताव होता. या विषयावरील चर्चेत शाहूनगर येथील सर्पोद्यानाच्या गैरव्यवहाराचा विषय सदस्यांनी उपस्थित केला. प्राण्यांची तस्करी हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचे सांगत नगरसेविका आशा शेंडगे यांनी या प्रकरणाचे पुढे काहीच कसे झाले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मगरींची चोरी होते, सापांचे मृत्यू, मोराचा मृत्यू यासारख्या गंभीर घटना झाल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई झाली नाही, याकडे त्यांनी सभेचे लक्ष वेधले. प्राणिसंग्रहालय राष्ट्रवादीच्या माजी पक्षनेत्या मंगला कदम यांच्या प्रभागात असल्याने त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होताच त्या संतापल्या. प्राण्यांची चोरी होते, त्याची चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्याची चौकशी करण्याचे काम आयुक्तांचे होते, ते त्यांनी केले नाही. आयुक्त काम करणार नसतील, मनमानी करणार असतील तर काळे फासू, असा इशारा कदम यांनी दिला. त्यास उत्तर देताना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी, हिंमत असल्यास आयुक्तांना काळे फासून दाखवाच, असे आव्हान दिले. सभागृहात सुरू असलेल्या गोंधळातच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश गोरे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. सापांचे मृत्यू, मगरींची चोरी, बेपत्ता झालेले अजगर आणि मृत्युमखी पडलेला मोर यांचा घटनाक्रम त्यांनी सांगितला, त्यामागची कारणे सांगतिली. डॉ. गोरे यांच्या खुलाशाने सदस्यांचे समाधान झाले नाही. अखेर, महापौरांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश प्रशासनास दिले.
सभेत सदस्यांची सातत्याने वादावादी होत होती. सुरूवातीला मंगला कदम तसेच सीमा सावळे व आशा शेंडगे यांच्यात वादावादी झाली. तर, नेहरूनगर येथील सार्वजनिक शौचालय वैशाली घोडेकर यांनीच पाडल्याचा आरोप सीमा सावळे यांनी केला. त्यामुळे घोडेकर प्रचंड चिडल्या होत्या. त्या मुद्द्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. महापौर काळजे तसेच मंगला कदम यांच्यातही खटके उडाले. सावकाश बोला, हळू बोला, विषयाला धरून बोला, अशा सूचना महापौर सातत्याने देत होते. एकमेकांची उणी-धुनी काढत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतच सभा पार पडली.





















Join Our Whatsapp Group