पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. असे असताना शहरातील महापालिका रुग्णालयामध्ये तंत्र-मंत्राने रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.१८) सकाळी समोर आला आहे.
रयत विद्यार्थी विचार मंचचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. त्यांनी म्हटले आहे की, सुरक्षारक्षक, पोलिस, तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्दळ असतानाही खुलेआम रुग्णालयात जादूटोणा व मंत्रोच्चार करीत एक व्यक्ती रुग्णावर उपचार करीत असताना सुरक्षारक्षक, डॉक्टर व कर्मचाऱ्यानी या चुकीच्या प्रकाराला रोखले नाही.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना देखील या कायद्याला न जुमानता शासकीय रुग्णालयात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम खुलेआम सुरु आहे. याची सखोल चौकशी करून या व्यक्तीवर व त्याला पाठीशी घालणाचा प्रशासनावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करावी असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.
याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले की, रुग्णालयामध्ये येणारी व्यक्ती ओपीडीसाठी येत आहे की तंत्रमंत्र करण्यासाठी येत आहे, हे ओळखणे अवघड आहे. मात्र, सीसीटीव्ही तपासून संबंधितावर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सुरक्षारक्षकांनाही सूचना दिल्या आहेत.