पिंपरी (Pclive7.com):- चांद्रयान-३ ने आज चंद्रावर यशस्वी लँडिंग करत एक इतिहास रचला आहे. इस्रोने केलेल्या या अभुतपुर्व कामगिरीचा संपूर्ण देशभर जल्लोष केला जात आहे. चिंचवड गावातील सराफ बाजारात देखील चांद्रयान ३ च्या कामगिरीचा फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी चिंचवड (जैन) विहार सेवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी भारतीय तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अश्या जोरदार घोषणा देत आनंद साजरा केला.
यावेळी सराफ बाजारातील विवेक जैन, प्रवीण सोनीगरा, मनीष सोनीगरा, संजय ऊर्फ गोपी बाफना, संजय कटारिया, आनंद मुथा, जितेश राठौड, हर्षद लुंकड़, रवि पाडोले, विनय दुगड, निखील खिंवसरा, नयन तन्ना, सचिन धोका, कपिल मेहता आदी उपस्थित होते.
चांद्रयान ३ च्या कामगिरीने भारताने आज इतिहास घडवला आहे. चांद्रयान २ अयशस्वी झाल्यानंतर चांद्रयान ३ कडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. संपूर्ण जगभरातून इस्रोच्या या कामगिरीकडे डोळे लागले होते. अखेर ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३ चंद्रावर लँड झाले. त्यामुळे समस्त भारतीयांची मने अभिमानाने आणि आनंदाने फुलून गेली आहेत.