आळंदी (Pclive7.com):- महाराष्ट्रात सध्या केवळ मराठा आरक्षणाची चर्चा आणि आंदोलन सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा समाजातील तरुण देखील आक्रमक झाले आहेत. आळंदीत श्रीकांत काकडे या तरुणाने चक्क पाण्याची टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. तरुणाच्या या आंदोलनामुळे पोलिसांसह नागरिक आणि कुटुंबाची धाकधूक वाढवली होती. अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाला खाली उतरविण्यात यश आले.
हा तरुण काल दुपारी थेट आळंदीतील पाण्याच्या टाकीवर पोहोचला आणि फलकाद्वारे त्याने मराठा आरक्षणाची मागणी केली. काही मिनिटांतच कुटुंबीय, नागरिक, पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. श्रीकांतची मनधरणी करण्याचे सर्व जण प्रयत्न करत होते. श्रीकांतचे कुटुंबीय देखील तिथे आले. परंतू श्रीकांत ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणविषयी ठोस निर्णय घेत नाहीत, बोलत नाहीत, असे म्हणत लवकरात-लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी श्रीकांतने केली. अखेर दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत चाललेलं हे शोलेस्टाईल आंदोलन मनधरणीनंतर मागे घेण्यात आले आणि श्रीकांतला खाली उतरवण्यात सर्वांना यश आले.