पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पिंपरी चिंचवड मधील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. निष्क्रिय मृत सरकारचा निषेध करत दशक्रिया विधी पार पाडत मुंडण देखील केले. चिंचवडमधील मोरया गोसावी समाधी घाट येथे आज (दि.३१) हा दशक्रिया विधी करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ३० दिवसाची वेळ घेतली होती. परंतु आज ४७ दिवस झाले तरी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. गेल्या सात दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. जर त्यांच्या आरोग्यास काही झाले तर मराठा समाज गप्प बसणार नाही आणि सरकारला हे आंदोलन परवडणार देखील नाही.
सध्या राज्यात दररोज पाच ते सहा मराठा बांधव आत्महत्या करत आहेत. तरीही या मृत पावलेल्या शासनाला जाग येत नाही. म्हणून या शासनाला जाग करण्यासाठी मुर्दाड निष्क्रिय शासनाचा निषेध म्हणून दशक्रिया विधी करुन निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सतीश काळे, प्रकाश जाधव, वैभव जाधव, नकुल भोईर, धनाजी येलकर, नलीनी पाटील, कल्पना गिड्डे, सुनिता शिंदे, रत्नप्रभा सातपुते, ब्रम्हानंद जाधव, रमेश कदम, तुषार गाडे पाटील, मारुती भापकर, मानव कांबळे, दीपक मोडवे पाटील, सुनील गव्हाणे, काशिनाथ जगताप, अनिल भोसले, संजय जाधव, संतोष शिंदे, अरुण खोपटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.