पिंपरी (Pclive7.com):- तीर्थक्षेत्र देहू हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्म व कर्मभूमी परंपरेनुसार तुकाराम बीज सोहळा व आषाढी पायी वारी पालखी सोहळा तसेच वसंत पंचमी हा संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस तसेच कार्तिकी वारीस जगभरातून लाखो वारकरी व भाविक भक्त श्री क्षेत्र देहू मध्ये येत असतात. देहूच्या दीडशे एकर गायरानापैकी पन्नास एकर गायरान हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाला देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत.
संत तुकाराम महाराज संस्थान व देहू ग्रामस्थांच्या वतीने या प्रस्तावाला विरोध करण्यात आला असून गायरान वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सदर आमरण उपोषणास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. सदरील गायरान देहूमध्ये होणाऱ्या विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात यावे तसेच सदरील जागेमध्ये विविध प्रकल्प उभारण्यात यावे यासाठी आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असे वाघेरे यांनी सांगितले.
यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, ह.भ. प. संजय महाराज मोरे विश्वस्त संत तुकाराम महाराज संस्थान, नगरसेवक योगेश परंडवाल, माजी नगराध्यक्ष स्मिताताई चव्हाण, नगरसेवक प्रवीण काळोखे, जनजागृती मंचचे अध्यक्ष प्रकाश काळोखे, युवा नेते प्रशांत काळोखे, माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे, माजी उपसरपंच प्रकाश हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.