पुणे (Pclive7.com):- पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याचा आमिषाने २१ लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जुलै २०१४ पासून १ डिसेंबर २०२३ दरम्यान घडला.
राहुल सतीश कुलकर्णी (रा. घर नंबर १८२, उल्हास सोसायटी, सहकार नगर नंबर २) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत गणपत पवार (रा. विठ्ठल रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कुलकर्णी याने चंद्रकांत पवार यांचा भाऊ राहुल यांना पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरी लावतो असे सांगितले. खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून सात लाख ५० हजार रुपये चेक स्वरूपात आणि १३ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात असे एकूण २१ लाख रुपये उकळले.
पवार यांच्या भावाला महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्यात आली नाही. तसेच, या नोकरी बाबत वारंवार विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत. कुलकर्णी याने सिक्युरिटी म्हणून पवार यांच्याकडे धनादेश दिलेले होते. हे धनादेश देखील बँकेत भरू न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.