पिंपरी (Pclive7.com):- बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेने पर्दाफाश केला. एका महिलेसह चार जणांना पुणे-नाशिक महामार्गावर, भोसरी येथून अटक करण्यात आली आहे.
शिवराज प्रकाश चांभारे कांबळे (वय ४०), महिला (वय ३६), धोंडिबा प्रकाश शेवाळकर (२४, तिघे रा. धावडेवस्ती, भोसरी), गणेश रामदास यंगड (२३, आ. आल्हाटवाडी, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराज आणि आरोपी महिलेचे स्टेशनरी साहित्य विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, आरोपींनी आपले अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र असल्याचे नागरिकांना भासवले. त्यांनी नागरिकांची बनावट कागदपत्रे बनवून दिली. विविध शासकीय कागदपत्रांमध्ये अनधिकृतपणे बदल केले. याबाबत पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी शिवराज, एक महिला आणि त्यांच्या दुकानात काम करणारे अन्य दोन आरोपी यांना अटक केली आहे. आरोपी मागील दोन ते तीन वर्षांपासून बनावट कागदपत्रे बनवण्याचे काम करत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.