अयोध्या (Pclive7.com):- अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भव्य प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देश-विदेशातील दिग्गजांना रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. देशभरातील रामभक्तांना आता फक्त रामललाच्या भेटीची ओढ लागली आहे. देशातील प्रत्येकाच्या मनी रामललाच्या दर्शनाची आस आहे. यापूर्वी गुरुवारी, १८ जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे.
गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर या मूर्तीचा फोटो समोर आला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामात गुंतलेले सर्व कामगार मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. म्हैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार आहेत. अरुण यांनी यापूर्वी अनेक रेखीव मूर्ती आणि शिल्प साकारली आहेत. अरुण यांच्या कामाचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलेलं आहे. अरुण यांचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार. तर, त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजानं संरक्षण दिलं होतं.
प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं भक्तांना दर्शन घेता येणार आहे. रामललाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी एकूण चार तासांपेक्षा अधिकचा वेळ लागणार आहे. भगवान श्रीरामाची ही मूर्ती मंत्रोच्चार आणि पूजाविधींसह पीठावर ठेवण्यात आली आहे. यावेळी शिल्पकार योगीराज यांच्यासह अनेक संतही उपस्थित होते. आता २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार असून प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तांना दर्शन घेता येणारे आहे.