सोलापूर (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी अटल सेतूच्या लोकार्पण केले होते. तसेच नाशिक येथे युवा महोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सोलापूरमध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबत अमृत योजनेंतर्गत इतर दोन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचेही पंतप्रधान भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.
असा असेल पंतप्रधानांचा दौरा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान मोदी यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. कुंभारी येथील रे नगरच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि रे नगर मॉडेल हाऊसची पाहणी करून ते विडी कामगारांशी संवाद साधणार आहेत. या संवादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे.
यावेळी एकूण 15 हजार घरकुलाचे वाटप केलं जाणार आहे. या घरकुलांमुळे असंघटित क्षेत्रातील 30 हजार कामगारांच्या घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. पंतप्रधान मोदी यांचा दीड तासाचा एकूण दौरा असून यावेळी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्यपाल उपस्थित असणार आहेत. या घरकुल लोकार्पण सोहळ्यात रे नगर प्रकल्प समितीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरी चादर, हातमागावर विणलेली शाल तसेच फेटा देवून सत्कार केला जाणार आहे.