पिंपरी (Pclive7.com):- कोट्यवधींच्या मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज विक्रीच्या प्रयत्नातील हॉटेल कामगाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या कामगाराच्या संपर्कातील पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने आता त्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी सुरू करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (दि.१) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाची याप्रकरणी कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
एक व्यक्ती विशालनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर सांगवी पोलिसांनी सापळा रचला असता, पिंपळे निलख परिसरात नमामी शंकर झा हा एमडी विक्रीसाठी आला असताना त्याला पकडण्यात आले. हॉटेलमध्ये कामगार असणाऱ्या झा हा राहात असलेल्या घराची झडती घेण्यात आली. त्यात एकूण २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी कुठून आणले, याची विचारणा पोलिसांनी आपल्या पद्धतीने केल्यावर झा याने निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका फौजदाराचे नाव घेतले. सांगवी पोलिसांनी अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर संबंधित उपनिरीक्षकाला सांगवी पोलीस ठाण्यात पाचारण करून त्याची दिवसभर चौकशी सुरू होती.
संबंधित पोलिस उपनिरीक्षक झा याच्याशी कसा संपर्कात आला?
झा याने २ कोटी २ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज कुठून आणले, हे अद्याप उघड झालेले नाही. त्याचबरोबर फौजदाराचा या सगळ्या प्रकरणात नेमका काय संबंध आहे, हेदेखील अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, पोलीस उपनिरीक्षकाचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध उघड होत असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
























Join Our Whatsapp Group