पिंपरी (Pclive7.com):- वाकड, पिंपळे निलख येथून उचललेला राडारोडा नदी पत्रात टाकणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ६१ हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
शनि मंदिर रोड, वाकड व पिंपळे निलख या भागांतून दररोज ट्रक, ट्रैक्टर, डंपर, टेम्पो- ४०७, आर.एम.सी. प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशी वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकताना व रस्त्यावर रेडिमिक्स काँक्रीट सांडत होते. त्यामुळे हवा प्रदूषण होत असल्या बाबतची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली होती. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन सापळा रचून या सर्व वाहनचालकांवर दि.२८ व दि.२९ फेब्रुवारी रोजी कारवाई केली.
नदीपात्रात भराव करणारे (१) कासीम शेख (वाहन क्र.एम.एच.४३/ बी.बी.१०००), (२) लक्कवा पुजारी (वाहन क्र.एम.एच.४८/ए.जी. ४४७७), (३) बसवराज कसबी (बाहन क्र. एम.एच.१२/जे.एफ.३९३) अशी तीन वाहने पकडून ३६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच शनी मंदिर रोड, वाकड रस्त्यावर रेडीमिक्स कॉक्रीट सांडत असताना एकुण ९ वाहने पकडून प्रत्येकी २५ हजार रुपये प्रमाणे एकुण २ लाख २५ हजार रुपये दंड आणि सर्व मिळून २ लाख ६१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर इंजिनियर स्वप्निल पाटील, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे, केमिस्ट पुष्पराज भागवत, यांनी ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण पथक प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे, तसेच एमएसएफ व मेस्को जवानांचे पथक यांची मदत घेवून कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान यापुढेही अशा प्रकारे नदी, नाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करणेत येईल असा इशारा पर्यावरण विभागामार्फत देण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group