लोणावळा (Pclive7.com):- “मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांच्यावर निशाणा साधला आहे. लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी पवारांनी म्हटलं की, मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली गेली. मी त्यांना सांगू इच्छितो. बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही. अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंवर घणाघात केला आहे.
‘भाजप सत्तेचा गैरवापर करतंय’
शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलं आहे की, लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून सुरू आहे. सामान्य माणसांचे अधिकार उध्वस्त होतील. त्यामुळं लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं. सत्तेचा गैरवापर भाजप करतं आहे. झारखंड, दिल्ली या राज्यात तेच घडतंय. नोटीस, समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ही लवकरच अटक केली जाईल, असंही पवारांनी म्हटलं आहे.