पिंपरी (Pclive7.com):- कर संकलन विभागाच्या मालमत्ता कराच्या ऑनलाइन बिलामध्ये उपयाेग कर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासन स्थगिती आदेशामुळे एकूण भरायची जी रक्कम आहे, ती उपयाेग कर्ता शुल्क वजा करून दर्शविण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना उपयाेग कर्ता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच अंतिम देय रक्कम जी बिलामध्ये दर्शविण्यात आली आहे, त्यामध्ये उपयाेग कर्ता शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे रहिवाशी मिळकत धारकांनी आपला थकीत मालमत्ता कर तत्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. यापैकी 4 लाख 33 हजार 759 मालमत्ता धारकांनी आपला पूर्ण कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महापालिकेच्या तिजाेरीत 886 काेटींचा महसूल जमा झाला आहे. असे असले तरी 2024-25 या आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला 1 हजार काेटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे पाच दिवस बाकी असताना 114 काेटींची वसुली करण्याचे माेठे आव्हान कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांच्या टीमपुढे असणार आहे. तर कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात प्रसिध्द करणे, नळ कनेक्शन खंडीत करणे, जनजागृती करण्यासह विविध माेहिमा हाती घेतल्या आहेत.
अंतिम टप्प्यात क्रिकेटच्या ट्वेंटी- ट्वेंटी सामन्याप्रमाणे जास्तीत-जास्त कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने कंबर कसली आहे. असे असतानाच कर संकलन विभागाचे कर्मचारी सदनिकाधारकांकडे कर वसुलीसाठी जातात, तेव्हा अनेकांनी उपयाेग कर्ता शुल्क रद्द झाला असताना त्या रक्कमेचा आमच्या बिलात समावेश झाला आहे, त्यामुळे आम्ही अद्याप कर भरला नसल्याचे सांगत आहेत. मात्र, ऑनलाइन बिलामध्ये उपयाेग कर्ता शुल्काची रक्कम दिसत असली तरी शासन आदेशामुळे शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे. बिलामध्ये एकूण भरायची जी रक्कम आहे, ती उपयाेग कर्ता शुल्क वजा करून दर्शविण्यात आली आहे. मालमत्ता धारकांना उपयाेग कर्ता शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच अंतिम देय रक्कम जी बिलामध्ये दर्शविण्यात आली आहे, त्यामध्ये उपयाेग कर्ता शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे मालमत्ता धारकांनी फक्त आपला थकीत कर त्वरीत भरावा.
दरम्यान, शहरात 5 हजार 500 लहान-माेठ्या साेसायट्या आहेत. यामधील 65 हजार 583 सदनिकाधारकांकडे तब्बल 161 काेटींचा कर थकीत आहे. त्यामुळे सदनिका धारकांनी आपल्या सदनिकेचा पाणी पुरवठा खंडीत होऊ नये, त्याचबराेबर सदनिका जप्त हाेऊ नये म्हणून तत्काळ कर भरावा. अन्यथा नाईलाजाने कठाेर कारवाई करावी लागेल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
निवासी मालमत्ता धारकांकडे 354 काेटींची थकबाकी
पिंपरी-चिंचवड शहरात 1 लाख 48 हजार 203 निवासी मालमत्ता आहे. या मालमत्ता धारकांना वेळाेवेळी कर भरण्याबाबत आवाहन केले. मात्र, त्यानंतरही कर न भरणा-या या मालमत्ता धारकांकडे तब्बल 354 काेटींची थकबाकी आहे. कर भरण्याची ऐपत असतानाही कर भरण्यास टाळाटाळ मालमत्ता धारकांनी करू नये. त्याउलट थकीत करावर दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांचेच नुकसान हाेत असल्याने अशा थकबाकीदार मालमत्ता धारकांनी तत्काळ कर भरून शहर विकासामध्ये याेगदान द्यावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
Tags: Pcmc Property taxPcmc TaxPcmc Tax DepartmentPimpri Chinchwad Municipal CorporationProperty Tax