पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (दि.२६) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. शिरूर मतदारसंघातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील देखील उपस्थित होते. शिवाजीरावांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतला शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे, त्यामुळे त्यांचं शिरूरमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणं निश्चित झालं आहे. शिरूर मतदारसंघामध्ये आता अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. कारण शरद पवारांकडून शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांचं तिकीटही निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना रंगणार आहे.