पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजप नेते तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेना नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ एप्रिलला (सोमवारी) सकाळी दहा वाजता काळेवाडी येथील रागा पॅलेस हॉटेलमध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक व मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी ही माहिती दिली. बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच महायुतीतील घटक पक्षांची संयुक्त बैठक होत आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच चंद्रकांतदादा पाटील व उदय सामंत हे नेते या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे, विरोधकांकडून करण्यात येणारी टीका व आरोप यांना उत्तरे, प्रचाराचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप, सर्व घटक पक्षांमधील समन्वय अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.
या बैठकीला मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीरंग बारणे यांनी केले आहे.