पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेच्या रिंगणात धनगर समाजातील उच्चशिक्षित डॉ.अक्षय माने उतरणार आहेत. काळेवाडी परिसरात वास्तव्यास असलेले डॉ.अक्षय माने यांनी यासंदर्भात प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती दिली आहे.
डॉ.अक्षय माने यांनी म्हटले आहे की, स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी कायमच धनगर समाजाचा संघर्ष राहिला आहे. माझा जन्म एका सर्वसामान्य धनगर कुटुंबामध्ये झाला आहे, वडील कायम सांगायचे की तुम्ही शिक्षण घेतलं तर आपली पुढची पिढी सुधारेल आपला समाज सुधारेल त्यामुळे शिक्षण घेतलंच पाहिजे, घरामध्ये शिक्षणाला कायमच महत्त्व होतं. आणि म्हणून माझं शिक्षण मी पूर्ण केलं. कुटुंबातल्या संस्कारांमुळे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे कायमच वाटायचं, आणि म्हणून स्वतःला मी सामाजिक क्षेत्रात व्यस्त करून घेतलं.
अलीकडच्या काही काळामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन असो, कोविड काळातील केलेली लोकांची सेवा, भव्य नोकरी मेळावा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, स्थानिक परिसरातील रोगराई प्रतिबंधात्मक उपाययोजना, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, कोरोना योद्धा सन्मान, कोरोना काळात गरजूंना अन्नदान, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, नागरिकांच्या विविध अडीअडचणीत मदत करणे, अशी एकच नाही तर अनेक कामे मी कायम करत आलेलो आहे. याच्या मागचा हेतू फक्त हाच की माझा समाज सुधारला पाहिजे. आज धनगर समाजाची भयानक परिस्थिती आहे, आजपर्यंत आम्हाला फक्त आश्वासन देऊन आमचा मतांसाठी वापर केला गेला. पण कोणीतरी याविरुद्ध आवाज उठवला केला पाहिजे. आणि म्हणून मी एक पाऊल पुढे यायचं ठरवलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
डॉ. माने यांनी पुढे म्हणाले आहे की, आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची परिस्थिती आपण सगळेजणच जाणतो. हा देश लोकशाहीचा देश आहे याचा आता कदाचित सर्वांना विसर पडत चाललेला आहे. आणि म्हणूनच ही लोकशाही टिकवण्यासाठी, माझ्या समाजाला सक्षम करण्यासाठी, सर्वसामान्य माणसाची ताकद या विस्कळीत राजव्यवस्थेला दाखवण्यासाठी मी या लोकसभेमध्ये, लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्साहामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आजवर माझी ताकद बनवून माझ्यासोबत असणारा माझा धनगर समाज, माझे सर्वच समाजबांधव, मला घडवलेल्या माझ्या गुरुजनांना व सर्वच माझ्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण तुमच्यामुळेच आज मला ही जनतेची सेवा करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सेवा हाच एक केंद्रबिंदू समजून मी काम करत राहील , हा शब्द देतो. तुमची साथ सोबत आजवर माझ्यासोबत होती, ती अशीच पुढे कायम राहील यात मला तीळ मात्र शंका नाही असे त्यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group